मालाड नववर्ष स्वागत समिती
कै. गणपत जीवनजी महंत यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांचे वारसदार कै. श्री. पुरुषोत्तम दादोबा महंत ह्यांनी १९५८ साली मालाड देवस्थान ट्रस्टची स्थापना केली. आता मालाड देवस्थान ट्रस्ट ही एक श्रद्धेचे स्थान आहेच, परंतु ही एक चळवळ देखिल झाली आहे. देवस्थानात अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. याच सामाजिक बांधिलकीने मालाड देवस्थान ट्रस्टद्वारे २००२ साली “मालाड नववर्ष स्वागत समिती” ची स्थपना झाली. श्री. श्रीपाद त्रैलोक्य (मालाड देवस्थान ट्रस्ट), श्री. देवल (ब्राह्मण सभा), कै. सोमनाथ राणे (मराठा समाज), श्री. कमलाकर बेडेकर (वनवासी कल्याण आश्रम), देवकीनंदन जिंदल (विश्व हिंदू परिषद), श्री. विष्णू गरुड (ज्येष्ठ नागरिक संघ), श्री शरद दिघे व श्री. मसुरकर (लोकमान्य टिळक वाचनालय), श्री. दत्ता करवीर (पांचाळ समाज) या आणि अशा सद्गृहस्थांनी एकत्र येऊन मालाड नववर्ष स्वागत समितीची स्थापना केली. राजकारणविरहीत सर्व संस्था व हिंदूप्रेमींना तसेच कार्यकर्त्यांना एकत्र आणणे हा मूळ हेतू आहे. ज्या प्रकारे रत्नागिरीत सावरकरांनी जातीभेदाच्या बेड्या मोडून हिंदू समाज एक केला त्याच प्रकारे या सद्गृहस्थांनी मालाड नववर्ष स्वागत समितीच्या माध्यमातून सबंध हिंदू समाज एक करण्याचा वीडा उचलला आहे.
गुढी पाडवा हे हिंदूंचे नववर्ष आहे. नववर्ष स्वागत यात्रेत सर्व समाजातील लोक एकत्र येतात. पण लोकांना एकत्र आणायचं असेल तर स्वागत यात्रेला उत्सवाचं स्वरुप प्राप्त झालं पाहिजे आणि त्याच बरोबर कला, संस्कृती यांचे जतन केले पाहिजे. म्हणूनच नववर्ष स्वागत यात्रेत चित्ररथ, ढोल-ताशा पथक, दहीहंडी पथक, लेझीम पथक, ध्वज पथक आणि इतर कलाकार आपली कला सादर करतात. हा सर्व देखावा डोळ्यात साठवून ठेवण्यासारखा असतो.
२००५ साली सुरु झालेला हा उत्सव आजही थाटामाटात संपन्न होतो. आज तर या उत्सवाला एक भव्य स्वरुप प्राप्त झाले आहे. तरुणाईच्या जल्लोषाने या उत्सवाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे. मालडमधील चळवळ्या सद्गृहस्थांनी सुरु केलेल्या या उत्सवास आपल्या सर्वांचा हातभार लागायला हवा. यासाठी आपण स्वतःहून येऊन चळवळीत सहभागी व्हावे असे नम्र आवाहन…
